आयुर्विमा टर्म प्लानचे माहात्म्य
आयुर्विमा: टर्म प्लानचे माहात्म्य
आजच्या धकाधकीच्या जीवनात वाढत्या अनिश्चिततेला पाहता ‘आयुर्विम्याला पर्याय नाही’ ही खरीच गोष्ट आहे. स्वतःला जबाबदार म्हणवणाऱ्या प्रत्येक कमावत्या व्यक्तीने स्वतःच्या आयुष्याचा विमा काढणे ही अनिवार्य गोष्ट समजली पाहिजे. मात्र गेल्या दोन लेखात बघितल्याप्रमाणे तुम्ही त्याची सांगड गुंतवणुकीशी घालायचा प्रयत्न केलात तर ‘तेल ही नाही, तूप ही नाही’ अशी अवस्था होऊन बसते. त्यामुळे आयुर्विमा घ्यावा तो फक्त आणि फक्त विमासंरक्षण देणारा – टर्म प्लान, ज्यात गुंतवणूक, परतावा ह्या भानगडी नसतील.
आता कोणीही विचार करेल की टर्म प्लानमधे फक्त विमासंरक्षण मिळते, आणि पारंपारिक पॉलिसीमधे विमासंरक्षणासोबत गुंतवणूक परतावा देखील मिळतो, भरलेल्या हप्त्याचे पैसे कालांतराने परत मिळतात. मग पहिलं दुसऱ्यापेक्षा सरस कसं काय?
ह्या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपल्याला दोन्हीच्या प्रीमियमची तुलना करावी लागेल. ज्यात विमासंरक्षणासोबत गुंतवणूक अंतर्भूत असते अशा एन्डोमेंट, मनी-बॅक इत्यादी प्रकारच्या पॉलिसीमधे आपल्याला जो वार्षिक प्रीमियम हप्ता भरावा लागतो तो त्याच रकमेच्या टर्म पॉलिसीच्या हप्त्याच्या सुमारे दहा-बारा पट अधिक असतो. म्हणजेच एखाद्याला रू ५० लाख रकमेचा २५ वर्षासाठी विमा काढण्यासाठी पारंपारिक पद्धतीच्या पॉलिसीमधे रू १.८-२ लाख वार्षिक हप्ता बसत असेल, तर टर्म प्लान मधे त्यासाठीचा वार्षिक हप्ता केवळ रू १५,०००-१८,००० असेल. ह्याचाच अर्थ, टर्म प्लान मुळे आपली वार्षिक जावक सुमारे ९०% ने वाचते. अशा पद्धतीने वाचवलेली रक्कम आपण गुंतवणुकीसाठी वापरून त्यातून चांगला परतावा मिळवू शकतो.
आपण बघितलं की पारंपारिक पॉलिसीमधे मिळणारा परतावा हा कंपनीच्या मर्जीनुसार दरवर्षी देऊ केलेल्या बोनसवर अवलंबून असतो. ढोबळमानाने २५ वर्षांच्या एन्डोमेंट पॉलिसीत सगळे प्रीमियमचे हप्ते भरले तर विमासंरक्षण रकमेच्या दुप्पट रक्कम आपल्या हाती पडते. म्हणजेच वार्षिक रू १.८-२ लाख प्रीमियम २५ वर्षे भरल्यास शेवटी सुमारे रू १ कोटी मिळू शकतात.
आता हेच नियोजन आपण वेगळ्या पद्धतीने केले– ५० लाखाचा टर्म प्लान रू १५,००० वार्षिक प्रीमियम मधे घेतला आणि वाचलेले (रू १,८०,००० वजा रू १५,००० असे) रू १६५,००० पुढील २५ वर्षे गुंतवणुकीसाठी वापरले तर किती परतावा मिळू शकेल? पुढील कोष्टकात वेगवेगळे गुंतवणूक पर्याय आणि त्यातून मिळू शकणारा परतावा यांची तुलना दिली आहे. या प्रत्येक पर्यायात रू ५० लाखाचा २५ वर्षांसाठीचा आयुर्विमा अंतर्भूत आहे.
|
पर्याय १ |
पर्याय २ |
पर्याय ३ |
पर्याय ४ |
|
पारंपारिक विमा पोलिसी |
पब्लिक प्रॉव्हीडंट फंड (PPF) |
इंडेक्स फंड |
म्युच्युअल फंड |
वार्षिक गुंतवणूक |
रू १,८०,००० |
रू १,६५,००० |
रू १,६५,००० |
रू १,६५,००० |
२५ वर्षांनंतर मिळणारी रक्कम |
रू १ कोटी |
रू १.२ कोटी |
रू २.२ कोटी |
रू ३.५ कोटी |
वार्षिक सरासरी परतावा (अंदाज) |
५.७% |
८% |
१२% |
१५% |
इथे हे नमूद केले पाहिजे की पर्याय ३ आणि ४ साठी वार्षिक सरासरी १२%-१५% परताव्याचे अंदाज हे भूतकाळातील परताव्यापेक्षा मुद्दाम कमी धरलेले आहेत. आतापर्यंतच्या भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासात कुठलाही सलग २५ वर्षांचा काळ घेतला तर इंडेक्स फंडनी (निफ्टी किंवा सेन्सेक्स प्रमाणे परतावा देणाऱ्या म्युच्युअल फंड योजना) १४% हून जास्त परतावा दिला असता. तसेच सर्वसाधारण म्युच्युअल फंड योजनेतून वार्षिक सरासरी १८%चा परतावा मिळू शकला असता.
वरील सुलभ अंदाज कोष्टकावरून हे सहज दिसून येते की टर्म प्लान आणि PPF ह्यांची जोडी सुद्धा नेहेमीच्या पारंपारिक आयुर्विमा पॉलिसीपेक्षा आपल्याला जास्त परतावा मिळवून देऊ शकते. म्हणजेच रू ५० लाखाचा विमा तर मिळेलच पण सुमारे २०% जास्तीचा परतावा देखील मिळेल. म्युच्युअल फंडातील सर्वात सोपा इंडेक्स योजनांचा पर्याय निवडल्यास रू ५० लाखाच्या विम्यासोबत २५ वर्षात सुमारे सव्वादोन कोटीची पुंजी जमा होऊ शकेल.
आणि आपण जर व्यवस्थित अभ्यासपूर्वक निवडलेल्या म्युच्युअल फंड योजनांमध्ये अशी गुंतवणूक करत गेलो तर मिळणारा परतावा हा अनेक पट जास्त असू शकतो. हातचं राखून केलेली आकडेमोड सुद्धा साडेतीन कोटीचा आकडा दर्शवते.
आपण विमा आणि गुंतवणूक ह्यात जमीन-अस्मानाचा फरक आहे आणि आर्थिक नियोजन करताना त्यांचा पूर्णपणे स्वतंत्र विचार केला पाहिजे हे ध्यानात घेतले तर आर्थिक साक्षरतेमधला मोठा टप्पा गाठला असं म्हणता येईल.
टर्म प्लान बद्दल अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतातील बहुतेक सर्व आयुर्विमा कंपन्या – भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) सुद्धा - आता टर्म पॉलिसी ऑनलाईन विकतात. त्यामुळे देशभरातील कुठलाही ग्राहक मध्यस्थाशिवाय थेट कंपनीकडून ही पॉलिसी विकत घेऊ शकतो. विमाविक्रेत्याकडून पॉलिसी घेण्यापेक्षा तीच थेट कंपनीकडून घेतल्यास प्रीमियमचा हप्ता २०-२५% कमी पडतो. अर्थातच, आपल्याला एजंटचं कमिशन द्यावे लागत नाही त्याचा हा फायदा.
वरील सगळ्या गणितात एक गोष्ट मात्र विसरून चालणार नाही. कुठल्याही गुंतवणुकीच्या यशासाठी फार महत्त्वाच्या कुठल्या गोष्टी असतील तर त्या आहेत शिस्त आणि संयम. आपण एन्डोमेंट पॉलिसी घेतली तर दरवर्षी प्रीमियम हप्त्याची रक्कम सक्तीने भरावीच लागते. बहुतेकदा लोक अक्षरशः भक्तिभावाने आयुर्विमा पॉलिसीचे हप्ते भरताना दिसतात, त्याच्या अनुषंगाने इतर खर्च भागवतात. पारंपारिक आयुर्विमा पॉलिसीत सक्तीपोटी शिस्त पाळली जाते आणि आपण दरवर्षी पॉलिसीचा गुंतवणूक परतावा मोजत नसल्यामुळे, २०-२५ वर्षं सातत्याने हप्ते भरत असल्याने, अज्ञानातून का होईना पण संयम ही पाळला जातो.
एकदा का टर्म प्लान आयुर्विमा काढून झाला की मग दीर्घकालीन गुंतवणूक म्युच्युअल फंडात करताना अशी सक्ती नसते. SIPचे हप्ते चुकले तरी काही दंड होणार नसतो, किंवा नवीन गाडी घ्यायची आहे अथवा शेअर बाजारात पडझड होण्याची चिन्ह दिसायला लागली आहेत अशा कुठल्याही सबबीखाली आपण सहजी पैसे काढून घेऊ शकतो. त्यामुळे इथे आपले आर्थिक नियोजन आणि शिस्त पाळण्यासाठी आपला आत्मविश्वास, मानसिक कणखरता ह्यांची कसोटी लागते. जर आपण ती शिस्त आणि संयम पाळू शकलो तर त्यामुळे होणाऱ्या फायद्याची कल्पना वरील कोष्टक बघितल्यास आपण करू शकतो. अर्थात हा गुंतवणुकीच्या अंगाने करायचा विचार झाला. आयुर्विम्याच्या दृष्टीने कमीत कमी प्रीमियममधे सर्वाधिक विमा संरक्षण देणारा – ‘आखूडशिंगी, बहुदुधी’ – असा टर्म प्लानच सर्वोत्तम.
--- प्राजक्ता कशेळकर